जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्या आणि लोकवस्तींवर केलेल्या गोळीबारात ३ नागरिक ठार, तर १७ जखमी झाले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) प्रत्युत्तरात कारवाई केली.दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्र शब्दांत निंदा करताना आंतरराष्ट्रीय समुदायाने या देशाला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.बीएसएफच्या प्रवक्त्याने सविस्तर माहिती देताना सांगितले की, पाक सैनिकांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. प्रारंभी लहान शस्त्रांचा वापर केल्यानंतर आर.एस.पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करण्यात आला. किशनपूर, जोर फार्म, जुगनू चक, नवापिंड, घरना, सिया,अब्दुल्लियान आणि चंदू चक या आर.एस.पुरा सेक्टरमधील भागात गुरुवारी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास गोळीबार आणि तोफा डागण्यास सुरुवात झाली, तर अर्निया सेक्टरच्या इतर वस्त्यांमध्ये पहाटे ४ वाजता पाकच्या सैनिकांनी गोळीबार केला. सीमेवरील दुर्गम गावांनाही त्याचा फटका बसला. गोळीबारात तीन नागरिकांचा बळी गेला, तर १७ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये दोन आर.एस.पुरा, तर एक अर्निया सेक्टरमधील आहे. गोळीबारात अनेक जनावरे जखमी झाली असून काही इमारतींचेही नुकसान झाले असल्याचे जम्मूचे पोलीस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी सांगितले. बीएसएफच्या जवानांनीही सडेतोड उत्तर देत पाकिस्तानी बाजूच्या आघाडीच्या चौक्यांवर गोळीबार केला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. (वृत्तसंस्था)मुत्सद्देगिरीत अपयश आल्याने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडला आहे. जगापुढे तोंड दाखविण्याची हिंमत या देशात राहिलेली नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्येतूनच सीमेवर त्याच्या कुरापती सुरू आहेत. त्यातच बारामुल्ला जिल्ह्याच्या राफियाबादमध्ये दहशतवाद्याला पकडण्यात आल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. -निर्मलसिंग, उपमुख्यमंत्री, जम्मू-काश्मीरदिवसाचा प्रारंभ अत्यंत भयावह झाला. भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीबाबत थंड डोक्याने विचार आणि सद्बुद्धीने काम करतील अशी अपेक्षा आहे.-ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री,जम्मू-काश्मीर
पाकचा लोकवस्तींवर गोळीबार; तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 02:16 IST