ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पाकमधून आलेल्या बोटीद्वारे भारतात दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले असतानाच पाकिस्तान दहशतवाताविरोधात लढा देत असल्याचे 'प्रमाणपत्र' अमेरिकेने पाकला दिले आहे. या क्लीनचीटमुळे पाकला अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सच्या मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०१० मध्ये अमेरिका व पाकिस्तानने केरी - लुगार या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. यानुसार अमेरिकेकडून पाकिस्तानला २०१० ते २०१४ याकालावधीत १.५ अब्ज डॉलर्स प्रतिवर्ष ऐवढी आर्थिक मदत मिळू शकणार होती. मात्र .हा निधी मिळवण्यासाठी पाकला अल कायदा, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद अशा दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी लागेल अशी प्रमुख अट ठेवण्यात आली होती. भारत दौ-यावर येण्यापूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकला दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये पाक दहशतवादाविरोधा लढा देत असल्याचे म्हटले आहे. केरींकडून प्रमाणपत्र मिळाल्यावर बराक ओबामा लवकरच पाकला आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर करतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात येत आहेत. या दौ-याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखला जात असून या हल्ल्यांना पाकचे पाठबळ असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयावर नरेंद्र मोदी ओबामांकडे निषेध नोंदवतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.