अमेरिकेने १०४ भारतीय घुसखोरांना हात पाय बांधून भारतात पाठवून दिल्याच्या घटनेवरून टीका झाल्यावर परराष्ट्र मंत्र्यांनी महिलांना आणि मुलांना ही वागणूक दिली नसल्याचे सांगितले होते. परंतू, या विमानातून आलेल्या ३० वर्षीय महिलेने आपल्याला लोखंडी हातकड्या, कंबर आणि पायाला बांधलेल्या साखळ्या घालण्यात आल्या होत्या असे सांगितले आहे. तसेच लष्करी विमानात बसविले परंतू, कुठे नेले जात आहे, हेच सांगितले गेले नसल्याचे या महिलेने दावा केला आहे.
जीव धोक्यात घालून लवप्रीत नावाची महिला आपल्या १० वर्षांच्या मुलाला घेऊन अमेरिकेत गेली होती. डंकीच्या रस्त्याने हाल अपेष्टा सहन करत ही महिला तिकडे गेली होती. परंतू, तिला २७ जानेवारीला अमेरिकेत घुसताच ताब्यात घेण्यात आले होते. २५ दिवसांचा हा जिवघेणा रस्ता तिने मुलाच्या भविष्यासाठी पार केला, असे म्हटले आहे. एवढा त्रास भोगला परंतू आयुष्याने पुन्हा आम्हाला इथेच आणून ठेवले, असे ती म्हणाली.
एजंटने या मायलेकराला अमेरिकेत पोहोचविण्यासाठी एक कोटी रुपये घेतले होते. इक्वाडोर, कोलंबिया, ग्वाटेमाला आणि अलसाल्वाडोर करत मेक्सिको गाठले होते. जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने या गेल्या होत्या. अमेरिकेत पोहोचताच अटक करण्यात आली होती. दोन जानेवारीला लवप्रीतने मुलासोबत भारत सोडला होता. पोलिसांनी पकडताच सीम कार्ड काढून टाकण्यास सांगितले होते, बांगड्या, इअरिंग आदी देखील काढण्यास सांगितले गेले होते.
यानंतर आम्हाला पाच दिवस कुठल्यातरी कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. दोन फेब्रुवारीला मला बेड्या घालण्यात आल्या होत्या. कंबरेपासून खाली पायांपर्यंत लोखंडी साखळी होती. माझ्या मुलासोबत हे केले नाही, असे तिने सांगितले. विमानात बसविले तेव्हा आम्हाला कुठे नेले जातेय हे सांगितले नाही. परंतू, विमान उतरल्यानंतर आम्हाला समजले की आम्ही अमृतसरला आलो आहोत. अमेरिकेला जाण्यासाठी आम्ही खूप कर्ज काढले होते. नातेवाईकांकडून पैसे घेतले होते. परंतू, कॅलिफोर्नियातील आमच्या नातेवाईकांकडे पोहोचू शकलो नाही, असे लवप्रीतने सांगितले.