Pahalgam Terror Attack, Viral Video Man Eye Witness: काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी धर्म विचारला आणि नंतर हिंदूंची हत्या केली. भरदिवसा दुपारच्या वेळी हा प्रकार घडला. यावेळी परिसरात विविध पर्यटक उपस्थित होते. त्यापैकी एक पर्यटक झिपलाइनवरून थरारक खेळ खेळत होता. त्याने शूट केलेल्या व्हिडीओमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला कैद झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज त्या व्यक्तीने एएनआयला मुलाखत देताना, एक मोठा खुलासा केला.
त्यावेळी मी हवेत होतो अन् खाली...
व्हायरल झालेल्या व्हिडीओतील व्यक्ती ही गुजरातच्या अहमदाबादची असून, त्यांचे नाव रिषी भट असे आहे. त्यादिवशी ते झिपलाइन वर अँडव्हेंजर स्पोर्ट्सचा आनंद घेत असताना काय घडले याचे त्यांनी वर्णन केले. ते म्हणाले, "आम्ही कुठल्याही टूर कंपनीच्या मार्फत गेलो नव्हतो. आम्ही स्वतंत्र गेलो होतो. मी १६ तारखेला अहमदाबाद मधून निघालो. २२ तारखेला जेव्हा घटना घडली तेव्हा मी पहलगाममध्ये होतो. १२ वाजता आम्ही तेथे पोहोचलो, घोड्यावर बसून वरती गेलो, फोटो वगैरे काढले आणि मग झिपलाईनसाठी गेलो. माझ्या मुलानंतर मी झिपलाइनवर गेलो. मी तिथे हवेत असताना अचानक ४ ते ५ वेळा गोळीबार झाला."
तीन वेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबाराला सुरुवात
"पहिले ३० सेकंद मला काहीच समजलं नाही. मी माझ्याच धुंदीत मजा मस्ती करत होतो. मग मला कळलं की खाली गोळीबार सुरु आहे. लोक मरत आहेत. ५-६ जणांचा गोळ्या लागल्या आहेत. त्यानंतर मला कळलं की इथे दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. ते दहशतवादी तीनदा 'अल्लाहू अकबर' ओरडले आणि त्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली. माझ्या आधी ज्या दोन कुटुंबानी झिपलाइन केलं होतं, त्यातील पुरुषांना धर्म विचारून आणि हिंदू असल्याचं सांगितल्यावर गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. माझ्या मुलाने आणि पत्नीने मला हे सांगितलं. मग मी खाली उतरताच सगळ्यांना घेऊन जीव वाचवायला पळून टेकडीवरू खाली गेलो," असा थरारक अनुभव त्यांनी सांगितला.
जीव कसा वाचला?
"आम्ही धावत असताना एक मोठा खड्डा होता, तेथे बाकी लोकंही लपले होते. तेथेच आम्हीही लपलो. ८-१० मिनिटांनी थोडा गोळीबार कमी झाला. आम्ही पुन्हा धावत असताना परत गोळीबार सुरु झाला. त्यात काहींना गोळी लागली. आमच्या डोळ्यादेखत अंदाजे १५-१६ लोकांना गोळ्या लागल्या. आम्ही मेन गेट वर पोहोचलो तेव्हा स्थानिक लोक निघून गेले होते. एक घोडेवाला होता, तो आम्हाला पुढे घेऊन जात होता. त्यावेळी आम्हाला भारतीय आर्मीचे लोकही भेटले. आर्मीच्या जवानांनी आम्हा पर्यटकांना कव्हर केले होते," असे रिषी भट म्हणाले.
आर्मीचे जवान किती वेळात आले?
"भारतीय लष्कराच्या सैनिकांनी अंदाजे २० ते २५ मिनिटांत पूर्ण पहलगाम कव्हर करून घेतले होते. सुमारे १५० सैनिकांनी आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी कडे तयार केले होते. मी मधल्या वेळेत माझ्या आर्मीत असलेल्या मित्राला फोन केला होता. त्याने सांगितले की, 'पार्किंगपर्यंत धावत जा, कुठेही थांबू नको. स्थानिक लोकांवर विश्वास ठेवू नको. कोणत्याही घरात घुसू नको.' त्यानुसार आम्ही सगळं करत गेलो. तेथे जे घडलं ते खूपच भयानक होते," असे त्यांनी सांगितले.