पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मीरमधील संवेदनशील भागांमध्ये लष्कर, सीआरपीएफ आणि इतर सुलक्षा दलांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांकडून अत्यंत सतर्कता बाळगून शोधमोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेंतर्गत अनंतनाग जिल्ह्यातील विविध भागात धाडी टाकण्यात आल्या असून, दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना सहकार्य करण्याच्या संशयावरून आतापर्यंत सुमारे १७५ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
तसेच काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त मोबाईल व्हेईकल पोस्ट स्थापन करण्यात आल्या आहेत. जनतेला सहकार्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच नागरिकांना त्यांनी कुठल्याही संशयास्पद हालचालींची सूचना जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मंगळवारी २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला होता. त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये शांतता परतत असल्याच्या आणि सर्वसामान्यांसाठी येथील परिस्थिती सुरक्षित झाल्याच्या सरकारच्या दाव्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता सुरक्षा दलांनी या परिसरात गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवायांना गती दिली आहे.