Mohan Bhagwat PM Modi Meeting: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर भारताकडून कसा प्रतिसाद दिला जाऊ शकतो, याची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत दुपारी उच्चस्तरीय बैठक केली होती. त्यानंतर लगेचच मोहन भागवत यांच्याशी बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सूत्रांनी सांगितले की ही बैठक पहलगाम हल्ल्यासंदर्भात होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक सुमारे दीड तास चालली. सध्याच्या घडामोडींमध्ये ही अपडेट खूप महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कडक प्रत्युत्तर देण्याचे केंद्र सरकारला आवाहन केले होते. ते म्हणाले होते, "आम्हाला तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे. लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर ठार करण्यात आले. हिंदू असे कधीही करणार नाहीत. आमच्या मनात वेदना आहेत. आम्हाला खूप राग आहे." त्यामुळे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि भागवत यांच्यातील ही भेट विशेष असल्याची चर्चा आहे.
"आपल्या प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा त्यांना इजा पोहोचवत नाही. पण जर कोणी वाईट करायला सुरुवात केली, तर दुसरा पर्याय काय? राजाचे कर्तव्य म्हणजे प्रजेचे रक्षण करणे. राजाने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे आणि गुंडांना धडा शिकवणे हे देखील कर्तव्याचा एक भाग आहे," असे म्हणत पंतप्रधानांचे नाव न घेता मोहन भागवत यांनी सल्ला दिला होता.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सशस्त्र सेना दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितले की दहशतवादाला योग्य दणका देणे हाच राष्ट्रीय संकल्प आहे.