Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. आतापर्यंत या हल्ल्याचे अनेक फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत. पण, आता या हल्ल्यातील सर्वात धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दहशतवादी निष्पाप पर्यटकांवर गोळ्या घालताना स्पष्टपणे दिसत आहे.
दहशतवाद्यांच्या क्रूरतेचा व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये एक पर्यटक झिप लाईन अॅडव्हेंचर करताना दिसतोय. झिप लाईनवरुन जाताना तो स्वतःचा व्हिडिओ शूट करतो, पण या व्हिडिओत गोळीबाराची संपूर्ण घटना कैद होते. या पर्यटकाला खाली गोळीबार सुरू असल्याची कल्पना नव्हती, त्यामुळे तो व्हिडिओमध्ये हसताना दिसतोय. व्हिडिओ पर्यटक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. त्यांच्या ओरडण्याचे आवाजही व्हिडिओत स्पष्टपणे ऐकू येतो.
तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला दिसेल की, दहशतवादी खाली पर्यटकांवर बेच्छुट गोळीबार करत आहेत. त्यातील एक पर्यटक गोळी लागल्याने खाली कोसळताना व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. या व्हिडिओमुळे त्या दिवशी नेमके काय झाले, हे जगासमोर आले आहे.
पहलगाममध्ये काय घडले?22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26 पर्यटक मारले गेले. दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यातील पर्यटकांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारले आणि नंतर त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी काही पुरूषांना त्यांच्या पँट काढायला लावल्या आणि पर्यटक हिंदू असल्याची पुष्टी केली. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे.