चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जागे झालेल्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला ध्रुव हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी दिली आहे. काश्मिरातील दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग होणार आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या भागात जवानांची तैनाती असती तर लोकांचा बळी गेला नसता ही वस्तुस्थिती आहे. संरक्षण मंत्रालयाने काश्मीरमधील छुप्या दहशतवादी कारवायांवर बारीक नजर ठेवण्यासाठी लष्कराला ॲडव्हांस लाइट हेलिकॉप्टर ध्रुवचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे.
डोंगराळ प्रदेशात ऑपरेशन करण्यात आहे सक्षमध्रुव हेलिकॉप्टर डोंगराळ प्रदेशात ऑपरेशन करण्यात सक्षम आहे. सशस्त्र सेना आणि तटरक्षक दलाकडून या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो. लष्कराकडे १८० ध्रुव हेलिकॉप्टरसह अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज ६० रुद्र हेलिकॉप्टर आहेत. गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर कोस्ट गार्ड एएलएच एमके ३ च्या भीषण अपघातानंतर सर्व ध्रुव हेलिकॉप्टर बेड्यात ठेवण्यात आले होते.