पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. तसेच पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांची हत्या केल्यानंतर पाकिस्तानला कुटनीतिक मार्गांबरोबरच लष्करी कारवाईमधून अद्दल घडवण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी रात्रीपासून काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर संघर्षाचा भडका उडाला असून, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दिशेने रात्रभर गोळीबार केला. त्यानंतर भारतीय लष्कराकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्यांमधून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात भारतीय लष्कर आणि नागरिकांची कुठलीही हानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, भारतीय लष्करामधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर लहान हत्यारांच्या मदतीने हल्ला केला आहे. तसेच आमचं लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती समोर येणं बाकी आहे.
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण असतानाच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी विविध पर्यायांवर सध्या विचार सुरू आहे. पहलगाममध्ये घडलेल्या नरसंहारानंतर भारतपाकिस्तानविरोधात युद्ध पुकारणार का, असा प्रश्न असंख्य लोकांना पडला आहे. मात्र, सीमेवर संपूर्ण युद्ध न होता कारगिलसारखी लघु युद्धे दोन्ही देशांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्करालाही अतिशय सतर्क राहण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला असून, ही काही गोष्टींची पूर्वतयारी असू शकते असेही म्हटले जात आहे.
दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी हे चार पर्याय काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे नष्ट करण्यासाठी चार प्रमुख पर्याय भारतीय लष्कराने केंद्र सरकारला सुचविले. त्यातील एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ब्रह्मोस, पृथ्वी क्षेपणास्त्रांसारख्या जमिनीवरून जमिनीवर मारा करता येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करावा. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे या क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करता येतील. उर्वरित तीन पर्यायही विचाराधीन असून, त्यापैकी एक म्हणजे भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. म्हणजे लष्कर सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करून, एलओसी पार करून दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करून माघारी येईल, असे सांगितले जात आहे.