पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. याची मुदत आज संपत आहे. सर्वांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यामुळे ज्यांना सीमा बंद होण्याची भीती आहे, ते त्यांच्या देशात जात आहेत. परंतू, असे हजारो लोक आहेत जे तसूभरही हललेले नाहीत. अशा लोकांना शोधून शोधून पाकिस्तानात हाकलून देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांना दिले आहेत.
एकट्या दिल्लीतच पाच हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. पाकिस्तानींनी सीमेजवळील राज्येच नाहीत तर अगदी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात देखील वास्तव्य केलेले आहे. आता सर्वच राज्यांत शोधमोहिम सुरु केली जाणार आहे. काही नागरिकच या पाकिस्तानींची माहिती देत आहेत. अशांना पकडून वाघा बॉर्डरवर धाडले जाणार आहे. दिल्लीत ५००० लोकांची ओळख पटविण्यात आल्याचे आयबीने म्हटले आहे. भारताच्या या गुप्तचर यंत्रणेने या लोकांची यादीच दिल्ली पोलिसांकडे दिली आहे.
पुण्यात बंडगार्डन सारख्या लष्करी तळ असलेल्या भागात सुमारे १११ पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने लाँग टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश सर्वाधिक आहे. त्यासह व्हिजिटर व्हिसावर आलेले पाकिस्तानीदेखील काही प्रमाणात शहरात आहेत. महत्वाचे म्हणजे काही वर्षांपूर्वी वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी म्हणून आलेले ३०-३५ पाकिस्तानी परत पाकिस्तानात गेलेले नाहीत. हे पाकिस्तानी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेकुठे लपलेले आहेत.
बेकायदा आलेल्यांचे काय...परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. परंतू जे बेकायदा आले आहेत, त्यांची कोणाकडेच नोंद नसते. या लोकांना भारतातीलच लोक बनावट कागदपत्रे, नातेवाईक असल्याचे सांगून असे कागद बनवून घेतात. यामुळे हे लोक राजरोसपणे राहतात. अशा लोकांना शोधण्याचे मोठे कष्ट यंत्रणेला घ्यावे लागणार आहेत.