पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तान विरुद्ध सिंधू पाणी करार रद्द करण्याबरोबर इतरही विविध प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. याशिवाय युद्धाची शक्यताही दिसत आहे. यातच, एआयएमआयएम प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही केंद्र सरकारकडे पाकिस्तान विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. ते हैदराबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.ओवेसी म्हणाले, "जर भाजप सरकार पाकिस्तान विरोधात कारवाई करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करत असले तर, आता त्यांना 'घर में घुसकर मारेंगे' च्याही पलीकडे जायला हवे. आता 'घर में घुसकर बैठ जाना' या निर्धाराची आवश्यकता आहे." ते म्हणाले, कश्मिरात सर्व पक्षांनी आधीच POK आमचा आहे, यासंदर्भातील रिझॉल्यूशन पास केले आहे.
मोठ्या कारवाईची आवश्यकता - गेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा हवाला देत, आता दहशतवादाविरोधात निर्णायक लढाई आवश्यकता असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 26/11 घडले, पुलवामा घडले, उरी झाले, पठानकोट झाले, रियासी झाले. आता, दहशतवाद नष्ट करा, असे संपूर्ण विरोधी पक्ष आपल्याकडे बोलत आहे. दहशतवादाचा खात्मा व्हायला हवा, असे सर्वच विरोधी पक्ष सरकारकडे म्हणत आहेत.
तत्पूर्वी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, आपण पूर्णपणे सरकारसोबत आहोत. त्यांनी पहलगामच्या दहशतवाद्यांची तुलना कुत्र्यांशी केली होती. एवढेच नाही तर, एका कार्यक्रमात बोलताना, पाकिस्तानची कुवत नाही, तो अर्धा तास नव्हे, तर पंन्नास वर्षे मागे आहे. ओवैसी यांनी पाकिस्तानला आरसा दाखवत म्हटले होते की, ते मलेरियावर औषध बनवू शकत नाही, पाकिस्तान मोटारसायकलचे टायर बनवू शकत नाही, भारत तुमच्यापेक्षा फार पुढे आहे, भारताशी पंगा घेऊ नका.