नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तिकीट वाटपावरून आम आदमी पक्षामध्ये रणकंदन माजलेले आहे. दरम्यान, तिकीट वाटपावरून आपच्या कार्यकर्त्यांनी आपच्याचा आमदाराला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा आरोप आमदार गुलाब सिंह यांच्याच समर्थकांवर होत असून, प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. आता कायदेशीर कारवाई केली जात आहे.
या मारहाणीसंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये आमदार स्वत:चा बचाव करण्यासाठी पळताना दिसत आहेत. तर काही लोक त्यांचा पाठलाग करत आहेत. हे कार्यकर्ते गुलाब सिंह यांना धक्काबुक्की करताना आणि कॉलर पकडून बुक्के मारताना दिसत आहेत. मात्र या घटनेबाबत आपकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या मुद्द्यावर कुठलेली विधान केलेले नाही.
आमदार गुलाब सिंह यांना झालेल्या मारहाणीबाबत दिल्ली पोलीस खात्यातील डीसीपी हर्षवर्धन यांनी सांगितले की, आमदार गुलाब सिंह यांना मारहाण झाल्याची माहिती रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मिळाली. तिकीट वाटपावरून हा वाद झाला होता. त्यानंतर पक्षातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जबाबानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
दरम्यान, भाजपाने या प्रकरणावरून आम आदमी पक्षावर टीका करत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच पैसे घेऊन तिकीट विकत असल्याने आपच्या कार्यकर्त्यांनी गुलाब सिंह यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.