श्रीनगर- श्रीनगर-गुलमर्ग हायवेवर नारबलजवळ एक कॅब दगडफेक करणाऱ्यांच्या तावडीत सापडल्याची घटना सोमवारी घडली आहे. या दगडफेकीत एका 22 वर्षीय तामिळनाडूतील पर्यटकाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत. दगडफेकीत मृत्यू झालेल्या तरूणाची आई व इतर एक जण जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्यांनी जवळपास सहा गाड्यांना लक्ष केलं.
रविवारी शोपियनमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचे पाच दहशतवादी मारले गेले, या घटनेचा निषेध करण्यासाठी दगडफेक करण्यात आली. मृत्यू झालेल्या तरूणाची आर, तीरूमणी अशी ओळख पटली असून तो चेन्नईचा आहे. दगडफेकीत तीरूमणीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तेथे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. 'या घटनेने माझी मान शरमेने झुकली आहे,' अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे.
कॅबमधून जात असताना गाडीवर दगडफेक झाली, यामध्ये तीरूमणीच्या डोक्याला जखम झाली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती तीरूमणीच्या वडिलांनी मेहबूबा मुफ्ती यांना दिली.