नवी दिल्ली : कोलकाता राजधानीत पुरविण्यात आलेल्या जेवणात झुरळ सापडल्यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कॅटरिंगला भारतीय रेल्वेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला़ अन्य नऊ कॅटरर्स सेवांनाही प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविल्याबद्दल एकूण ११़५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली़ त्याने सांगितले की, विविध रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा तपासण्यासाठी आम्ही गत महिन्याभरापासून एक विशेष मोहीम आरंभली आहे़ या मोहिमेदरम्यान १३ गाड्यांमध्ये प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे आम्हाला आढळले़ असे निकृष्ट जेवण पुरविणाऱ्या आयआरसीटीसी, आरक़े़ असोसिएट्स, सनशाईन कॅटरर्स, सत्यम कॅटरर्स, वृंदावन फूड प्रॉडक्ट्स आदी कॅटरर्स सेवांविरुद्ध आम्ही कारवाई केली़ कोलकाता राजधानीत प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणात झुरळ आढळले़ तर परवाना रद्द होणार निकृष्ट अन्न पुरविल्याप्रकरणी कुठलीही कॅटरर्स सेवा पाचदा दोषी आढळल्यास त्याचा परवाना रद्द केला जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जेवणात झुरळ सापडल्यामुळे एक लाखाचा दंड
By admin | Updated: August 4, 2014 02:12 IST