कोच्ची: समुद्रात टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा मोठा फटका येत्या काळात जलचरांना बसणार आहे. प्लास्टिक कचरा टाकण्याचं हे प्रमाण कायम राहिल्यास २०५० साली सुमद्रात मासे कमी आणि प्लास्टिक जास्त असेल, असा धोक्याचा इशारा सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) प्रमुख शास्त्रज्ञ व्ही. क्रिपा यांनी दिला आहे. सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स ऑन मरिन डेब्रिजचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना क्रिपा यांनी प्लास्टिकमुळे भविष्यात किती गंभीर संकट निर्माण होणार आहे, यावर प्रकाश टाकला. 'माणसाकडून समुद्रात टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकचं प्रमाण दरवर्षी ४.८ मिलियन टनांनी वाढतं आहे. त्यामुळे २०५० मध्ये समुद्रात ८५० मिलियन मेट्रिक टन प्लास्टिक आढळून येईल. मात्र त्याचवेळी समुद्रातील माशांचं वजन केल्यास ते फक्त ८१२ मिलियन मेट्रिक टन इतकं असेल,' अशी आकडेवारी क्रिपा यांना मांडली. 'संशोधन आणि अभ्यासातून मिळालेल्या आकडेवारीनुसार आताच्या घडीला समुद्रात ५.२५ ट्रिलियन प्लास्टिक डेब्रिज आहे. यापैकी २ लाख ६९ हजार टन प्लास्टिक समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत असून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा समुद्राच्या तळाशी आहे,' अशी चिंताजनक माहिती क्रिपा यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितली. 'समुद्राच्या तळाशी असलेल्या प्लास्टिकमुळे जलचरांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या तिन्ही भागातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे,' असा धोक्याचा इशारादेखील त्यांनी दिला.
धोक्याची घंटा... '२०५० मध्ये समुद्रात प्लास्टिक जास्त आणि मासे कमी असतील'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 14:16 IST