नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांतील निवृत्त कर्मचाऱ्यांना ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना लागू करणारी अधिकृत अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने अखेर शनिवारी रात्री जारी केली.सरकारने ही मागणी ५ सप्टेंबर रोजीच तत्त्वत: मान्य केली होती. पण बिहार निवडणूक जाहीर झाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. निवडणूक उरकताच यासंबंधीची अधिसूचना काढली गेली. मात्र सरकारने लागू केलेली ही योजना आहे त्या स्वरूपात आम्हाला मान्य नाही, असे या मागणीसाठी जंतरमंतरवर धरणे आंदोलन केलेल्या ‘इंडियन एक्स-सर्व्हिसमेन मूव्हमेंट’चे अध्यक्ष निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंग यांनी अधिसूचना जारी झाल्यावर लगेचच जाहीर केले. सरकारने याआधी घोषणा केली होती तेव्हाही आंदोलनकर्त्यांनी या योजनेत सात दोष असल्याचे म्हटले होते.आता जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पूर्वीच्या पेन्शनर्सचे पेन्शन सन २०१३ मध्ये निवृत्त झालेल्यांच्या पेन्शनच्या धर्तीवर पुनर्निर्धारित केले जाईल व त्याचे लाभ १ जुलै २०१४ पासून दिले जातील. ज्यांना सध्या सरासरीपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांचे पेन्शन कमी केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. अधिसूचनेनुसार सुधारित पेन्शनची थकबाकी चार समान वार्षिक हप्त्यांत दिली जाईल. मात्र स्पेशल अथवा लिबरलाईज्ड फॅमिली पेन्शनसह फॅमिली पेन्शन मिळणारे सर्व पेन्शनर व शौर्य पुरस्कारप्राप्त पेन्शनर यांना मात्र एकाच हप्त्यात सर्व थकबाकी दिली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘वन रँक, वन पेन्शन’ची अधिसूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 03:21 IST