पाटणा : बिहारमध्ये सत्तारूढ संयुक्त जनता दलाने पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या दहा जागांवरील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी महायुती करण्याचा निर्णय घेतला आहे. जदयू आणि राजद प्रत्येकी चार आणि काँग्रेस दोन जागांवर निवडणूक लढणार आहे. बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या दहा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये जदयू, राजद आणि काँग्रेस यांची महायुती होणे निश्चित झाले आहे. जदयू आणि राजद प्रत्येकी चार आणि काँग्रेस दोन जागांवर निवडणूक लढेल, असे जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंग म्हणाले.पोटनिवडणुकीत महायुतीतील कोणता पक्ष कोणत्या जागा लढेल, याबद्दल काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. याविषयी नंतर घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले. पोटनिवडणुकीत जदयू, राजद आणि काँग्रेस कोणत्या जागांवर निवडणूक लढणार आहे. याची यादी तयार आहे. परंतु त्याबद्दल ते वाच्यता करणार नाही, असेही ते म्हणाले. जदयू आणि राजदची युती असताना देखील माजी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव मंचावर एकत्र येण्याचे टाळतात. याविषयीचे वृत्त निराधार असल्याचे सांगून वशिष्ट म्हणाले, अलीकडे या दोन्ही नेत्यांचे फोनवर बोलणे झाले आहे. पोटनिवडणुकीत ते एकत्र प्रचार करणार आहेत. भाजपाचा मुकाबला करण्यासाठी महायुती आवश्यक असल्याचे सांगून वशिष्ठ नारायणसिंग यांनी महायुती केल्याबद्दल संबंधित पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले. पोटनिवडणुकीत जदयू, राजद आणि काँग्रेस उत्तम कामगिरी बजावणार असल्याचा दावा करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विद्यमान सरकारने महागाई, रेल्वेभाडे आणि अन्य समस्यांबद्दल केलेल्या आवाहनावरून जनतेचा भरवसा वेगाने कमी होत आहे. (वृत्तसंस्था)
नितीश, लालू अन काँग्रेसची महायुती
By admin | Updated: July 28, 2014 02:38 IST