पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री बनण्याच्या प्रयत्नात असलेले नितीशकुमार यांची बिहारच्या संयुक्त जनता दल विधिमंडळ पक्षनेतेपदी करण्यात आलेल्या निवडीला पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. गेल्या शनिवारी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या जागी नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती.‘विधानसभा सचिवांच्या पत्राचे राज्यपालांच्या निर्णयावर कायदेशीर परिणाम होऊ नयेत यासाठी या पत्राचे (नितीशकुमार यांना जदयू विधिमंडळ पक्षनेते म्हणून मान्यता देण्याच्या) कायदेशीर परिणाम तपासण्याची आवश्यकता आहे,’ असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या बुधवारी केली जाईल, असेही न्यायालयाने सांगितले.मांझी यांच्या बाजूने असलेले जदयूचे आमदार राजेश्वर राज यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश एल. एन. रेड्डी आणि न्या. विकास जैन यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचा हा आदेश नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात मोठा अडसर ठरण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी बिहारच्या राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केलेला आहे. परंतु राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. नितीशकुमार यांनी त्यांना पाठिंबा असलेल्या १३० आमदारांसह राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेच मांझी यांनीदेखील राज्यपालांना भेटून आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास तयार असल्याचा दावा केला होता.जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी नितीशकुमार यांची निवड करण्यासाठी गेल्या शनिवारी बोलावलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आ. राजेश्वर राज यांनी या याचिकेत आव्हान दिले आहे. (वृत्तसंस्था)
नितीशकुमार सापडले कोंडीत
By admin | Updated: February 12, 2015 02:52 IST