उत्तराखंडः टिहरी जिल्ह्यातील प्रतापनगर-कंगसाली-मदननेगी या मार्गावर लहान मुलांना घेऊन जाणारी व्हॅन दरीत कोसळली. या अपघातात 9 लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी आहेत. स्कूल व्हॅन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. टिहरी जिल्ह्यातील प्रतापनगरमध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळीच हा अपघात झाला आहे. घटनास्थळावरून लहान मुलांच्या रडण्याच्या आणि ओरडण्याचा मोठा आवाज येत असल्यानं त्या परिसरातही खळबळ उडाली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी एसडीआर, पोलीस आणि प्रशासनाची एक टीम पोहोचली असून, त्यांनी बचावकार्य राबवण्यास सुरुवात केली आहे. या स्कूल व्हॅनमध्ये जवळपास 17 लहान मुलं होती. अद्यापही मृत मुलांची ओळख पटलेली नाही. तर दोन मुलांचा मृत्यू हा जागीच झाल्याची माहितीही तहसीलदारांनी दिली होती.
स्कूल व्हॅन दरीत कोसळून नऊ लहानग्यांचा मृत्यू, आठ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 10:42 IST