निमिषा प्रियाला फाशीच्या शिक्षेपासून मिळालेला दिलासा थोड्याच वेळात पुन्हा धुसर होताना दिसत आहे. आता तलाल अब्दो मेहदीचा भाऊ अब्देल फत्ताह मेहदीने, आपण 'ब्लड मनी' स्वीकारणार नाही, असे म्हटले आहे. या गुन्ह्यासाठी क्षमा केली जाऊ शकत नाही. अब्देलफत्ताह म्हणाला, निमिषा प्रियाला मृत्यू दंडच द्यावा लागेल.याशिवाय, त्याने भारतीय माध्यमांनी निमिषाला पीडित संबोधल्याबद्दलही नाराजगी व्यक्त केली आहे.
खरे तर, निमिषा प्रियाला आज (१६ जुलै २०२५) फाशी देण्यात येणार होती. मात्र, दीर्घ वाटाघाटीनंतर तिची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली. यासाठी भारत सरकार, सौदी अरेबियातील एजन्सी आणि कंठापुरमचे ग्रँड मुफ्ती ए.पी. अबुबकर मुसलियार यांनी प्रयत्न केले. मुसलियार यांनी मध्यस्थीसाठी येमेनच्या शूरा कौन्सिलशी संपर्क साधला होता. या सर्व प्रयत्नांमुळे, पुढील आदेशापर्यंत निमिशाची फाशी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमच्या कुटुंबाने तडजोडीच्या सर्व ऑफर नाकारल्या आहेत -फाशीची शिक्षा पुढे ढकलताना निमिषा प्रियाच्या कुटुंबाला, तलालच्या कुटुंबाशी 'ब्लड मनी' संदर्भात बोलणी करण्यासाठी वेळ दिला जाईल, असे म्हटले होते. मात्र, हे सर्व अवघड दिसत आहे. कारण आपण ब्लड मनी स्वीकारणार नाही, असे तलालच्या भावाने म्हटले आहे.
तलालचा भाऊ अब्देलफत्ताह मेहदी म्हणाला, आमच्या कुटुंबाने तडजोडीच्या सर्व ऑफर नाकारल्या आहेत. आमच्या भावाच्या खुन्याला मृत्युदंड मिळावा, अशी आमची इच्छा आहे. माफीच्या प्रश्नावर अब्देलफत्ताह मेहदी म्हणाला, हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि यामध्ये कोणतीही माफी देता येणार नाही.
अल्लाह आमच्यासोबत -अब्देलफत्ताह मेहदीने पुढे म्हणाला, रक्त विकत घेता येत नाही. शिक्षा पुढे ढकलली गेली म्हणून आम्ही थांबणार नाही. न्याय विसरता येणार नाही. वेळ लागत असला तरी न्याय होईलच. फक्त काही वेळेचा विषय आहे आणि अल्लाह आमच्यासोबत आहे.