Tahawwur Rana Extradition To India: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले गेले आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. एनआयएने तहव्वूर राणाला पटियाला हाऊस NIA च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत एनआयएच्या विशेष न्यायालयात नेण्यात आले. रात्री उशिरा न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एनआयएच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाशी संबंधित तथ्ये न्यायालयात सादर केली. न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली गेली. यानंतर एनआयएचे वकील दयान कृष्णन यांनी तहव्वूर राणा यांच्याविरुद्धच्या कलमांचा उल्लेख करत, संबंधित उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर सादर केले. तसेच २० दिवसांची कोठडी मागितली.
एनआयएचे वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयाला सांगितले की, विद्यमान पुरावे आणि इतर तथ्यांची पुष्टी करण्यासाठी राणा यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. एनआयएने राणाची २० दिवसांची कोठडी मागितल्यानंतर किती दिवसांचा रिमांड द्यायचा, यावर न्यायालयाने सुरुवातीला आपला निकाल राखून ठेवला.
एनआयएकडून कोठडीचे समर्थन करण्यासाठी ठोस पुरावे सादर
गुन्हेगारी कटाचा एक भाग म्हणून आरोपी क्रमांक १ डेव्हिड कोलमन हेडलीने भारत भेटीपूर्वी तहव्वूर राणाशी संपूर्ण ऑपरेशनची चर्चा केली होती. संभाव्य आव्हानांचा अंदाज घेत, हेडलीने राणाला त्याच्या वस्तू आणि मालमत्तेची माहिती देणारा ईमेल पाठवला होता. त्याने राणाला इलियास काश्मिरी आणि अब्दुर रहमानचा कटात सहभागाची माहिती दिली. एनआयएने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाने पाठवलेल्या ईमेलसह त्याच्या कोठडीचे समर्थन करण्यासाठी ठोस पुरावे सादर केले. या भयानक कटाचा उलगडा करण्यासाठी कोठडीत चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात राणाची भूमिका काय होती, याचीही चौकशी तपास यंत्रणा करतील, असे एनआयएच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफसह निमलष्करी दलांचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. भारतात दाखल झालेल्या तहव्वुर राणाचा एक फोटो समोर आला आहे. राणाचा हा पाठमोरा फोटो असून, यात त्याचे पांढरे झालेले केस आणि अंगावर चॉकलेटी रंगाचे कपडे दिसत आहेत.