लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मी नेहमीच्या चौकटीतला राजकीय नेता नाही. माझा अधिक वेळ उत्तम कारभार करण्यावर खर्च होतो. निवडणुकांमध्ये भाषणे करणे ही गरज असते. पण, अशी भाषणे करणे मला आवडत नाही. मी कधीही कम्फर्ट झोनमध्ये राहिलो नाही. जोखीम घेऊन काम करण्याच्या माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर अद्याप व्हायचा आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. मोदी यांनी प्रथमच पॉडकास्ट केले असून, त्यासाठी झेरोधाचे संस्थापक निखिल कामथ यांनी त्यांची मुलाखत घेतली.
मी देव नाही, माणूस आहे; चुका माझ्याकडूनही होतात : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कठोर परिश्रम करेन, स्वहित साधण्यासाठी कोणतेही काम करणार नाही. मी देव नाही, मी माणूस असल्याने माझ्याकडूनही चुका होतात, मात्र जाणूनबुजून कोणतीही चूक करणार नाही, अशा तीन गोष्टी गुजरातचा मुख्यमंत्री बनल्यानंतर ठरविल्या होत्या. त्यांचे काटेकोर पालन मी केले.
महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवणार
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आगामी काळात महिलांसाठी विधानसभांमध्ये आणि लोकसभेमध्ये एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणाचा फायदा घेऊन महिलांनी स्वत:तील क्षमतेचा विकास करावा. सोशल मीडियाने लोकशाही अधिक मजबूत केली.