ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - दिल्लीसह देशभारतील अनेक राज्यं आणि लष्करानेही मॅगी नूडल्सवर घातलेल्या बंदीनंतर उत्पादक कंपनी असलेल्या 'नेस्ले'नेत देशभरातून 'मॅगी' काढून घेण्याचा निर्णय घेतला असून बाजारातून मॅगीचे स्टॉक्स परत मागवले आहेत. गुरूवारी रात्री कंपनीने एका पत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला असला तरी 'मॅगी' संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करत लवकरच बाजारात परत येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मॅगी नूडल्समध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळल्याने वाद निर्माण झाला होता. मॅगीचे नमुने सदोष आढळल्यानंतर केरळ, दिल्लीपाठोपाठ गुरुवारी तामिळनाडू, गुजरात, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनीही मॅगीवर तात्पुरती बंदी लादली. याच पार्श्वभूमीवर नेस्लेने बाजारूतन मॅगीची पाकिट परत मागवली आहेत. 'सध्याच्याघटना आणि प्रॉडक्टविषयी व्यक्त केलेली निराधार चिंता यामुळे ग्राहकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही बाजारातून हे प्रॉडक्ट हटवण्याचा निर्णय घेतला आहे ' असे कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 'सजा हा प्रस्न सुटेल, आम्ही तुमच्या भरवशाची मॅगी तत्काळ बाजारात आणू' असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
तामिळनाडू व उत्तराखंड सरकारने तीन महिन्यांसाठी तर गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारने मॅगी नूडल्सच्या व्रिकीवर एक महिन्याची बंदी लादली आहे. मॅगीवर बंदी लादणाऱ्या यादीत उत्तराखंडचाही समावेश झाला आहे. गुजरातमध्ये नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळले. उत्तराखंडात मॅगी नूडल्सच्या ३०० नमुन्यांपैकी दोन नमुने तपासणीत ‘फेल’ ठरले. यानंतर मॅगीच्या उत्पादनावर बंदी जाहीर करण्यात आली. उत्तराखंडातील प्रयोगशाळेत तपासलेल्या दोन नमुन्यांमध्ये अधिक मोनोसोडियम ग्लूटामेट आढळले.
दरम्यान मॅगी नूडल्स आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आढळल्यास नेस्ले इंडिया आणि मॅगीची जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली.