नवी दिल्ली: सीबीएसईनं नीट 2018 परीक्षेसाठी ड्रेस कोडसंदर्भात महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. 6 मे रोजी नीटची परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण सूचना वाचूनच परीक्षा केंद्रावर यावं, असं आवाहन सीबीएसईनं केलं आहे. गेल्या वर्षी नीट परीक्षेदरम्यान ड्रेस कोर्डवरुन मोठा वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडसंदर्भात महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी फिकट रंगाचे हाफ स्लिव्सचे कपडे घालून येण्याची सूचना करण्यात आली आहे. या कपड्यांना कोणत्याही प्रकारची बटणं नसावीत. कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा अॅक्सेसरीज घालून न येण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी बूट घालून येऊ नका. स्लीपर्स किंवा लहान हिल असलेल्या सँडल घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. बुरखा, पगडी यांच्यासारखे धर्माशी संबंधित असलेले कपडे परिधान करणाऱ्यांनी परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणू नये. विद्यार्थ्यांना पेन, पेन्सल, पाण्याची बाटलीदेखील परीक्षा केंद्रात आणता येणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेलं प्रवेश पत्र न विसरता सोबत आणावं, असं सीबीएसईनं जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राशिवाय परीक्षा देता येणार नाही. मंगळवारी सीबीएसईकडून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देण्यात आलं आहे. 5 जूनला नीट परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड... फिकट रंग, अर्ध्या बाह्या, बुट नको तर चप्पलच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 08:39 IST