ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - युपीए सरकारच्या मनरेगा व आधार कार्डसारख्या योजनांचं काम युपीए - २ च्या काळात अत्यंत संथगतीने झाले परंतु याच योजनांना एनडीए सरकारने अवघ्या ९ महिन्यांत या दोन्ही योजनांना अत्यंत वेगाने राबवल्याचं नरेंद्र मोदींनी आकडेवारीसह सांगितले. राज्यसभेमध्ये भाषण करताना मोदींनी ९ महिन्यांचा लेखाजोगा मांडला आणि सरकारचे पाय जमिनीवर असून हे सरकार गरीबांसाठीच झटत असल्याचं ठासून सांगितले.
भूमी अधिग्रहण कायद्याच्या बाबतीत लोकांची दिशाभूल करण्याचं काम विरोधकांनी करू नये असं आवाहन करतानाच नुकसान भरपाई आधीच्या कायद्याएवढीच मिळणार असून एक रुपयाही कमी होणार नाही याची ग्वाही मोदींनी दिली. अरूण जेटलींनी मांडलेल्या बजेटमध्ये गरीब, शेतकरी आणि मागास वर्गीयांसाठी प्रचंड तरतुदी असल्याचं सांगत हे बजेट गरीबांचं बजेट असल्याचं मोदी म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी केलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी व विकास विरोधी असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं सगळ्यांनी समजून घ्यायला हवे असे सांगत कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही नरेंद्र मोदींनी दिली तसेच भूमी अधिग्रहण कायदा नव्या सव्रुपात मंजूर होणे ही देशाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी मोदी आक्षेपार्ह आरोप करत असल्याचा आरोप करत त्यांचे भाषण अनेकवेळा थांबवण्याचा प्रयत्न केला.