दंतेवाडा - छत्तीसगड येथील बस्तर भागात ४५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेली गुम्मदिवेली रेणुका ऊर्फ चैत ऊर्फ सरस्वती ही महिला नक्षलवादी सोमवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाली. ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दंतेवाडा, बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात सोमवारी सकाळी ही चकमक झाली. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी या भागात सुरक्षा दलांनी मोहिम हाती घेतली आहे. नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळाची तपासणी केली असता तिथे रेणुकाचा मृतदेह आढळून आला. ती तेलंगणातील वरंगळ येथील मूळ रहिवासी आहे. तिच्याकडून एक रायफल, अन्य काही शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली. तिला पकडण्यासाठी छत्त्तीसगडमध्ये २५ व तेलंणाम २० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. तर, बिजापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणांहून तेरा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.
१३५ नक्षलवाद्यांचा खात्मायंदाच्या वर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १३५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ३१ मार्च २०२६पर्यंत देशातील नक्षलवाद संपविण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याआधीच जाहीर केले आहे.