जम्मू : उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याचा कबुलीजबाब बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवून घेतला. विशीतील नावेदला कडक सुरक्षा बंदोबस्तात सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. नावेदच्या सुरक्षेसाठी त्याच्या डोक्यात हेल्मेट घालण्यात आले होते.कोणत्याही दबावाखाली नव्हे तर स्वच्छेने जबानी देत असल्याचे त्याने उर्दूत लेखी नमूद केल्यानंतर त्याला जेवणासाठी कारागृहात पाठविण्यात आले. दुपारी १ वाजता पुन्हा हजर करण्यात आले असता संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत जबाब नोंदविण्याची प्रक्रिया चालली. तो १४ दिवसांपासून राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) ताब्यात आहे. त्याने स्वेच्छेने कबुलीजबाब देणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याला एनआयएच्या अधिकाऱ्यांपासून दूर ठेवण्यात आले होते. त्याला आपल्या विधानावर फेरविचार करता यावा, हा त्यामागचा उद्देश होता. गेल्या पंधरवड्यात एनआयएने नावेद आणि अटक केलेला ट्रकचालक खुर्शीद अहमद भट याची कसून चौकशी केली आहे. दरम्यान, नावेदला पाहण्यासाठी कोर्टाच्या आवारात लोक गोळा झाले होते. (वृत्तसंस्था)
नावेदचा कबुलीजबाब
By admin | Updated: August 27, 2015 04:21 IST