Narendra Modi Tamilnadu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात महान चोल राजे राजेंद्र चोल प्रथम यांच्या १००० व्या जयंती समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी चोल साम्राज्याचा समृद्ध वारसा आणि त्याच्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सान्याल यांनीही चोल राजांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि भारताचा इतिहास पुन्हा समजून घेण्याची गरज यावर भर दिला.
चोल साम्राज्याबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?आपल्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी गंगाईकोंडा मंदिरात प्रार्थना केली. या दरम्यान, चोल साम्राज्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चोल राजांनी त्यांचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध श्रीलंका, मालदीव आणि आग्नेय आशियापर्यंत वाढवले होते. राजराजा चोल यांनी एक शक्तिशाली नौदल निर्माण केले. राजेंद्र चोलांनी ते आणखी मजबूत केले. त्यांनी भारताला सांस्कृतिक एकतेत जोडले होते. आज आपले सरकार चोल काळातील विचारांना पुढे नेत आहे. काशी-तमिळ संगमम आणि सौराष्ट्र-तमिळ संगमम सारख्या कार्यक्रमांद्वारे, आपण शतकानुशतके जुने एकतेचे धागे आणखी मजबूत करत आहोत. चोल काळात भारताने गाठलेली आर्थिक आणि धोरणात्मक प्रगती अजूनही आपली प्रेरणा आहे.
भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा एक अद्भुत इतिहास... अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहासकार संजीव सान्याल यांनी पंतप्रधानांनी चोल साम्राज्याला दिलेल्या महत्त्वावर आपला मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात की, उत्तर भारतात मुस्लिम राजवटीत चोल साम्राज्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. इतिहासाचा अभ्यास दिल्ली-केंद्रित राहिला. आपल्याला आपल्या इतिहासाचा पुनर्विचार करावा लागेल. आपल्या पूर्वजांनी मोठी मंदिरे बांधली, नवीन शहरे उभारली. ते बलवान, जोखीम घेणारे लोक होते. त्यांनी परदेशी आक्रमकांचा सामना केला. आपल्या इतिहासात, विशेषतः इस्लामपूर्व इतिहासात आपण ज्या व्यक्तीचा आदर करतो तो म्हणजे सम्राट अशोक.
सन्याल पुढे म्हणाले, चोलांचा सन्मान होत आहे, याचा त्यांना आनंद आहे, परंतु आग्नेय आशियाच्या इतिहासावर आपली छाप सोडणारे ते एकमेव लोक नव्हते. तमिळनाडूमध्ये इतर अनेक लोक आहेत. त्यांच्या शेजारील राज्य केरळमधील पांड्य आणि चेर होते. त्यानंतर पल्लव, नंतर गजपती आणि कलिंगचे सर्व राजे आहेत, ज्यांचे आग्नेय आशियाशी मोठे सागरी संबंध होते. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा रोमन साम्राज्याशी संबंधांचा अद्भुत इतिहास आहे. देशाच्या प्रत्येक भागाचा इतिहास अद्भुत आहे, पण आपण दिल्ली-केंद्रित दृष्टिकोनाने वेडे झालो आहोत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.