ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष भोजन आयोजित केले असतानाच मोदींनी अमेरिका दौ-यातही नवरात्रीचा उपवास सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमेरिका दौ-यात मोदींच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न अधिका-यांना सतावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिका दौ-यावर जाणार आहेत. मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष भोजनाचे आयोजन केले आहे. तसेच अमेरिकेतील भारतीय दुतावासानेही मोदींसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मात्र या दौ-यादरम्यान नवरात्र असल्याने मोदींनी उपवास असणार आहे. विशेष म्हणजे अमेरिका दौ-यातही उपवास सुरु ठेऊ असे मोदींनी अधिका-यांना सांगितले आहे. गेल्या चार दशकांपासून नरेंद्र मोदींनी नवरात्रीत उपवास करत असून या दरम्यान ते फक्त पाणीच पितात. अमेरिका दौ-यातील भरगच्च कार्यक्रम पाहता मोदींनी उपवासादरम्यान व्हिटामीनयुक्त ज्यूस प्यावे अशी विनंती काही अधिका-यांनी मोदींना केली होती. मात्र मोदींनी यावर प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे अमेरिकेतही मोदी फक्त पाणी पिऊनच उपवास करतील अशी चिन्हे आहेत. पंतप्रधान उपवास करणार असल्याने त्यांच्या दौ-यातील धावपळ कशी कमी होईल यासाठी अधिका-यांनी प्रयत्न सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदींच्या दौ-याविषयी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र दौ-यातील भरगच्च कार्यक्रम पाहता हा दौरा आणखी व्यस्त करु नका अशी सूचनाही अधिका-यांनी या अनिवासी भारतीयांना केली आहे.