लखनौ : कुंभमेळा तसेच गंगा-यमुनेच्या संगमासाठी प्रसिद्ध असलेल्या अलाहाबादचे नाव बदलून ते प्रयागराज करण्याचा विचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चालविला आहे.
यासंदर्भात त्यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले, अलाहाबादचे नामांतर व्हावे अशी असंख्य लोकांची इच्छा असली तरी या विषयाबाबत एकमत होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास हा निर्णय अमलात आणला जाईल. पुढील वर्षी शहरात होणाऱ्या कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुुरू झाली असून, तिचा वेळोवेळी सरकारकडून आढावा घेण्यात येतो.
अलाहाबादचे प्रयागराज असे नामांतर करावे, अशी मागणी आखाडा परिषद व इतर संस्था, व्यक्तींनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला राज्यपाल राम नाईक यांनी मंजुरी दिल्याचेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत अलाहाबाद नामांतर प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी बनविलेल्या फलकांवर अलाहाबादऐवजी प्रयागराज असा उल्लेख करण्यात आल्याचेही निदर्शनास आलेआहे.कुंभमेळ्यापूर्वी करणार नामांतर१५ जानेवारीपासून अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होईल. त्याआधीच हे नामांतर व्हावे असा योगी आदित्यनाथ सरकारचा प्रयत्न आहे.याआधी उत्तर प्रदेशमधील मुघलसराय या रेल्वेस्थानकाचे पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे नामांतर करण्यात आले होते. उपाध्याय हे जनसंघाचे नेते होते.