ऑनलाइन लोकमत,
नवी दिल्ली, दि. १७ - भारत हे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी संघ परीवाराने कार्यक्रम आखला असून त्या संदर्भात सुन्नी मुस्लीम काऊंसिलतर्फे संघाला सहा प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मुस्लीम नेत्यांचा सहभाग असलेल्या जाहीर कार्यक्रमात देऊ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश यांनी मुस्लीम संघटनांना सांगितल्याचे वृत्त आहे.
सुन्नी उलेमा काऊंसिलचे मुख्य सचिव हाजी मोहम्मद सलीस यांनी संघाचे प्रचारक इंद्रेश यांची भेट घेत त्यांना विचारलेल्या सहा प्रश्नांची उत्तरं देण्यास इंद्रेश यांनी टाळले असल्याचे सलीस यांनी सांगितले. भारत हिंदू राष्ट्र करणार का, भारत जर हिंदू राष्ट्र करणार असाल तर त्याकरता काही प्रयोजन केले आहे का, जर भारत हिंदू राष्ट्र होणार असेल तर त्याकरता हिंदू धर्माचे नियम असणार आहेत की संघ नवीन नियमावली तयार करणार आहे असे प्रश्न सलीस यांनी संघाचे प्रचारक इंद्रेश यांना विचारले. सलीस यांनी असे सांगितले की, इंद्रेश यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले असून सार्वजनिकरित्या आम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ असे सांगितले आहे.
जर इंद्रेशजी ९० मिनिटांच्या बंद खोलीमध्ये उत्तर देण्यास असमर्थ असतील तर ते समुहापुढे काय उत्तर देणार, मुस्लीम जनतेकडून ही मंडळी काय अपेक्षा करते, ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यावेळी आमच्या पुर्वजांनी जिना आणि पाकिस्तान दोघांना नकारत भारत आणि गांधींचा मार्ग स्विकारला, धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. आमचे प्रतिनिधित्व औवेसीही करू शकत नाहीत. जी व्यक्ती दुस-यांच्या धर्माबद्दल गरळ ओकते ती मुस्लीम धर्माचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही, तसेच मुसलमान होण्याकरता आम्ही कोणावरही बळजबरी करत नाही. त्याचप्रमाणे मुस्लीम राहण्यास आम्ही कोणावरही दाबाव आणत नाही, तसा नियम आमच्या धर्मात नाही असेही सलीस यांनी सांगितले. सलीस यांनी संघासोबतच्या भेटीकरता आलम रजा नुरी यांना बोलवले असता त्यांनी इंद्रेश यांची यापूर्वी भेट घेतली असून त्यांना भेटण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. नुरी यांनी त्यांचे मुद्दे मोहन भागवत यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगितले.