साधुग्राममधील अनधिकृत व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
नाशिक : साधुग्राममधील अनधिकृत व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करीत साहित्य ताब्यात घेतले. महापालिकेने चक्क एक शाही पर्वणी झाल्यानंतर मोहीम राबविली आहे.
साधुग्राममधील अनधिकृत व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई
नाशिक : साधुग्राममधील अनधिकृत व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करीत साहित्य ताब्यात घेतले. महापालिकेने चक्क एक शाही पर्वणी झाल्यानंतर मोहीम राबविली आहे. साधुग्राममध्ये गेल्या महिन्याभरापासून अनधिकृत विक्रेत्यांनी रस्त्यांच्या आजूबाजूला ठाण मांडले आहे. मात्र महापालिकेने आज साधुग्राममधील मुख्य रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायिकांची दुकाने हटविली. त्यात व्यावसायिकांचे हातगाडेही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उचलून नेले आहेत. पूर्वसूचना न देता सदर अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली. सध्या तपोवनात अनधिकृत व्यावसायिकांनी मुख्य रस्त्याला लागून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे याठिकाणी गर्दी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होतो. तपोवनातील स्वामिनारायण चौकात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. महापालिकेला मात्र महिन्याभरानंतर कारवाई करण्याबाबत जाग आली आहे. साधुग्राममध्ये सोमवारी औरंगाबाद रस्त्यासह आखाडे, खालशांसमोरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य वाहनात टाकण्यात येत होते. तीन व्यावसायिकांचे हातगाडे ताब्यात घेण्यात आले असून, संध्याकाळी उशिरापर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू होती. ( प्रतिनिधी)