Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशाला लवकरच पहिली बुलेट ट्रेन मिळणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये सुरू होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबतचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
रेल्वे मंत्र्यांच्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील स्टेशनचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या प्रगतीचा वेग पाहता असे मानले जाते की, ऑगस्ट २०२७ पर्यंत बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू होईल. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबादचा प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई–अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळेल.
मुंबईत एकमेव भूमिगत रेल्वे स्टेशन
या प्रकल्पात जपानचे शिंकान्सेन (Shinkansen) हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञान वापरले जात आहे. या मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असून, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन हे मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन आहे. यासाठी जमिनीखाली ३२.५० मीटर (अंदाजे १०६ फूट) खोलीपर्यंत खोदकाम केले जा असून, या स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअरसह तीन मजले असतील.
स्टेशनमध्ये सहा प्लॅटफॉर्म
या मार्गावरील सर्व स्थानकांवर सहा प्लॅटफॉर्म असतील. प्रत्येक प्लॅटफॉर्म अंदाजे ४१५ मीटर लांब असेल. स्टेशन मेट्रो लाईन्स आणि रोडवेजशी जोडली जाईल. या रेल्वे स्थानकांवर दोन प्रवेशद्वार आणि दोन निर्गमन मार्ग बांधण्याची योजना आहे. स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असतील. प्रवाशांना स्टेशनवर कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही, याची खात्री केली जाईल.