Mukesh Ambani Nita Ambani : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये 'NMACC इंडिया वीकेंड' हा एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार होते. नीता अंबानी या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालक होत्या. प्रसिद्ध शेफ विकास खन्ना आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांसारखी मोठी नावेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. पण आता अंबानी कुटुंबाने एक महत्त्वाचा निर्णय घेत, हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले आहे.
या कार्यक्रमाबाबत NMACC ने माहिती दिली आहे की, काही अनपेक्षित परिस्थितीमुळे हा कार्यक्रम सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. परंतु हा तात्पुरता विराम आहे आणि भविष्यात तो कार्यक्रम निश्चितच पुन्हा आयोजित करण्याचा मानस आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील काही राजकीय तणावामुळे अचानक हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रशियन तेलावरून वाढता तणाव
स्वस्त रशियन तेल खरेदी करत राहिल्याबद्दल अमेरिकेने अलिकडे भारतावर कठोर भूमिका घेतली. अमेरिकन प्रशासनाने यावर भारताला इशारा दिला होता आणि रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी सरकारवर अनेक वेळा सार्वजनिकरित्या दबाव आणला. दरम्यान, अमेरिकेने आपला मुद्दा आणखी रेटण्यासाठी अनेक भारतीय उत्पादनांवर मोठे शुल्क देखील लादले आहे. रशियन तेल खरेदीबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतीय ऊर्जा कंपन्यांना थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे विधान
मुकेश अंबानी यांनी अलिकडेच आरआयएलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण करताना या संपूर्ण परिस्थितीवर आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, अशा संघर्षातून कोणत्याही गोष्टी चांगल्या होत नाही. जर देश एकमेकांना सहकार्य करत असतील तर व्यापार, गुंतवणूक आणि विकास सर्वांसाठी फायदेशीर ठरेल यावर त्यांनी भर दिला. जेव्हा राष्ट्रे एकत्र काम करतात तेव्हाच व्यवसाय मुक्तपणे चालतो आणि प्रत्येकजण यशस्वी होतो. त्यांनी स्पष्ट केले की या काळातील राजकीय अनिश्चितता समजून घेणे महत्त्वाचे आहे, परंतु या आव्हानांमध्ये व्यवसायाचे व्यवस्थापन देखील करावे लागेल.