लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील १४० कोटींपेक्षा अधिक जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आता संसदेच्या कँटीनमध्ये विशेष 'हेल्दी मेन्यू' देण्यात येणार आहे. नाचणी इडली, ज्वारी उपमा, मूग डाळीचे धिरडे यांसह इतरही अनेक पदार्थांद्वारे खासदार, अधिकारी आणि पाहुण्यांना पौष्टिकतेचा 'बुस्टर डोस' मिळणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने हा मेन्यू तयार करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ या वर्षाला ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले होते. यामध्ये भरड धान्यांना विशेष प्रोत्साहन देऊन पांढऱ्या तांदळासह तेलकट पदार्थांना थाळीतून निरोप देण्यात आला होता. संसदेच्या कँटीनमध्येही भरड धान्याला स्थान देण्यात आले आहे. ग्रीन टी, मसाला सत्तू, कैरी पन्हे यांचा समावेश पेय पदार्थांत केला आहे.
कोणकोणत्या पदार्थांची मेजवानी?संसदेच्या कँटीनमध्ये आता सांभार आणि चटणीसह नाचणीची इडली, ज्वारी उपमा, शुगर फ्री मिश्र भरड धान्य खीर, बार्ली आणि ज्वारी सॅलड, गार्डन फ्रेश सॅलड, बॉइल्ड व्हेजिटेबल्स, रोस्ट टोमॅटो, बसिल शोरबा, व्हेज क्लिअर सूप, चणा चाट, मूग डाळीचे धिरडे यांसह ग्रीन टी, हर्बल टी, मसाला सत्तू, गुळाचे कैरी पन्हे यांचा समावेश असेल.