पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने भारतात राहत असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. भारत-पाकिस्तानमध्ये माहेर-सासर असलेल्या महिला, त्यांची मुले मोठ्या प्रमाणावर आपापल्या देशांत गेली आहेत. जम्मू काश्मीर सरकारने देखील तिथे राहत असलेल्या पाकिस्तानी लोकांना बसमध्ये बसवून पंजाबमधील सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या बसमध्ये भारतासाठी शहीद झालेल्या व शौर्य चक्राने सन्मानित झालेल्या मुदस्सिर अहमद शेखची आई देखील होती. कारण ती पाकव्याप्त काश्मीरची होती. प्रशासनाला ही बाब समजताच सूत्रे हलली आणि तिला भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारांना पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सीमेवर पाठविण्यास सांगितले होते. यानुसार भारताने दिलेली मुदत संपल्यानंतर ही कारवाई केली जात होती. यामध्ये शमीमा अख्तर या देखील होत्या. काश्मीरमधून पंजाबला जात असलेल्या बसमध्ये शमीमा अख्तर यांना बसविण्यात आले होते. २०२२ मध्ये दहशतवाद्यांशी लढताना कॉन्स्टेबल मुदस्सिर अहमद शेख शहीद झाले होते. सरकारच्या आपण काय चूक करतोय हे लक्षात येताच पंजाबला जात असलेली बस थांबविण्यात आली आणि त्यांना लष्कराच्या वाहनातून पुन्हा घरी आणून सोडण्यात आले.
अहमद यांचे काका मोहम्मद युनूस यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. आपली वहिनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरची आहे. यामुळे तिला पाकिस्तानला पाठविले जात होते. परंतू ते आपले भारताचे क्षेत्र आहे, यामुळे तिला पाकिस्तानात पाठविले जाता नये होते. केवळ पाकिस्तानी नागरिकांनाच पाठवायला हवे होते, असे त्यांनी म्हटले आहे.
शमीमा यांचा दहशतवाद पसरण्यापूर्वी १९९० ला विवाह झाला होता. निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद मकसूद यांच्याशी तिचा विवाह झाला होता. अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना संपविण्याच्या मोहिमेत अहमद हे शहीद झाले होते. त्यांना २०२२ मध्ये मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती भवनात शमीमा यांनीच तो पुरस्कार स्वीकारला होता.