ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिरिराज सिंह यांची चांगलीच कानउघडणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी दिलेल्या तंबीनंतर गिरीराज सिंह यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी गिरिराज सिंह यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. भाजपा खासदार व मंत्र्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांना शरमेने मान खाली घालावी लागते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या मोदींनी सिह यांना चांगलेच फैलावर घेतले.
सोमवारी संसदेचे कामकाज संपल्यानंतर मोदींनी गिरीराज सिंह यांची भट घेतली. सोनिया गांधींविरुद्ध केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल त्यांनी सिंह यांना खडे बोल सुनावले. तसेच यापुढे असे कोणतेही बेजबाबदार वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीही पंतप्रधानांनी दिली. यावेळी भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी गिरीराज सिंह यांना कोणतेही विधान करण्यापूर्वी खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला. मोदींचा ओरडा खावा लागल्यामुळे एरवी तो-यात वावरणा-या सिंह यांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू तरळले. दरम्यान आपण पंतप्रधानांना भेटलो नसल्याचे सांगत गिरीराज सिंह यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.