ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवणारे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी चक्क नरेंद्र मोदींची स्तुती केली. मोदी हे उत्कृष्ट वक्ते असून त्यांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींची स्तुती केली आहे.
रविवारी अरविंद केजरीवाल यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवत त्यांच्यावर घणाघाती टीका करणा-या केजरीवाल यांनी मोदींचे कौतुक केले. केजरीवाल म्हणतात, मोदींनी जनतेला चांगला संदेश दिला आहे. यूपीए सरकारच्या काळात जनतेमध्ये नैराश्याचे वातावरण तयार झाले होते. पण मोदींनी गेल्या पाच महिन्यांमध्ये जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले. मात्र आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मोदी सरकार संथगतीने काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. जनतेला बदल हवा असून अजूनही ते बदलाच्या प्रतिक्षेत आहे. आता मोदी सरकार आगामी काळात काय कामगिरी करते ते बघू असेही त्यांनी म्हटले आहे.