जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात सामील असणाऱ्या ४ आतंकवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी असल्याचे समोर आले. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान भारताकडूनयुद्धाची तयारी केली जात आहे. भारतीय सेना, वायुदल आणि नौसेनेकडून युद्धाभ्यास केला जात आहे. तर, याच पार्श्वभूमीवर ७ मे रोजी देशभरात मॉकड्रिल घेतलं जाणार आहे.
भारत सरकारने युद्धाच्या आधी होणाऱ्या मॉकड्रिलचे आदेश दिले आहेत. उद्या म्हणजेच ७ मे रोजी देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे.एकीकडे भारतीय या मॉकड्रिलसाठी सज्ज झाले आहेत. तर, दुसरीकडे १९६५ आणि १९७१मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. १९६५ आणि १९७१च्या युद्धाआधी देखील देशभरात मॉकड्रिल घेण्यात आले होते. त्यावेळी मॉकड्रिलमध्ये काय काय झालं होतं? दोन्ही युद्धाआधी काय घडलेलं?भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी मीडियाशी बोलताना युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील आठवणी सांगताना ते म्हणाले,"१९७१ मध्ये जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले आणि युद्धादरम्यान जेव्हा जेव्हा सायरन वाजायचा, तेव्हा लोक घाबरून त्यांच्या घरात लपायचे. वीजपुरवठा खंडित होताच लोकांमध्ये चेंगराचेंगरी व्हायची. ते जमिनीवर पडून रात्रभर पहारा देत असायचे. घरांच्या भिंती आणि खिडक्या काळ्या रंगात रंगवल्या होत्या जेणेकरून शत्रूने त्यावर प्रकाश टाकला, तरी त्यांना काहीही दिसणार नाह. युद्धामुळे शाळा बंद होत्या. लोक एकत्र मिळून पहारा द्यायचे. कुणाच्याही घरात थोडासा प्रकाश दिसला तर, तो लगेच बंद केला जायचा. विमान दिसताच लोक ओरडू लागायचे."
एअर रेड सायरन आणि ब्लॅक आऊट म्हणजे काय?युद्धाच्या दरम्यान वाजणारे एअररेड सायरन हे एखाद्या फॅक्टरीमध्ये वाजणाऱ्या सायरनसारखेच असतात. सरकारच्यावतीने हे सायरन जागोजागी लावले जातात. सायरन वाजू लागताच लोक सतर्क व्हायचे. या युद्ध काळात सगळीकडे लख्ख काळोख केला जायचा,यालाच ब्लॅक आऊट म्हणतात. एखादा दिवा पेटवायचा असल्यास खिडक्यांना काळा रंग दिला जायचा. यामुळे शत्रूसेनेपासून स्वतःचा बचाव करता येत होता. उद्या होणाऱ्या मॉकड्रिलमध्येही लोकांना याच आवश्यक गोष्टींची माहिती दिली जाणार आहे.