ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी गुरुवारी मनसेला 'जय महाराष्ट्र' करुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुका तोडांवर असताना राम कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मनसेला धक्का बसला आहे.
विकास कामांऐवजी वादामुळे चर्चेत राहणारे मनसेचे घाटकोपर पश्चिम येथील आमदार राम कदम हे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंवर नाराज होते. विधान भवनाच्या आवारात पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर आमदार राम कदम आणि राज ठाकरे यांच्या दुरावा निर्माण झाला होता. राम कदम भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली असली तरी राम कदम यांनी याविषयावर मौन बाळगले होते.
गुरुवारी महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुण्यातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कदम यांनी मनसेचे 'इंजिन' सोडून भाजपचे 'कमळ' हातात घेतले.