चंदीगड : पंजाबमधील अकाली दल-भाजपा सरकारच्या विरुद्ध मांडण्यात आलेला प्रस्ताव सोमवारी चर्चेला न घेताच आवाजी बहुमताने फेटाळण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर पडण्यास नकार दिला आणि ते सारे आमदार रात्रभर सभागृहातच बसून राहिले वा झोपले. मंगळवारी ईदच्या कारणामुळे पंजाबच्या विधानसभेला रजा असून, आज रात्री म्हणजेच बुधवारपर्यंत आम्ही सभागृहातच बसून राहू, असे या आमदारांनी जाहीर केले आहे.अविश्वासाचा प्रस्ताव काल फेटाळला गेल्यानंतर काँग्रेसचे सर्व आमदार सभागृहात ठाण मांडून बसले. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही त्यांनी बाहेर पडण्यास नकार दिला. रात्र होताच, सभागृहातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. मात्र काही काळाने तो पुन्हा सुरू करण्यात आला आणि विधानभवन कँटिनच्या कर्मचाऱ्यांनी या आमदारांना खाद्यपदार्थही आणून दिले. अविश्वास ठराव फेटाळला जाणार, याची आम्हाला माहिती होती. आमच्याकडे सत्ताधारी पक्षापेक्षा अधिक सदस्य नसल्यामुळेच आम्ही विरोधी पक्षात आहोत. मात्र या ठरावाच्या निमित्ताने आम्हाला अनेक प्रश्नांना तोंड फोडायचे होते. मात्र मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी हुकूमशाही पद्धतीने आम्हाला चर्चाच करू दिली नाही आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सभागृहात धरणे देत आहोत, असे या आमदारांनी सांगितले. मुख्यमंत्री चर्चेपासून दूर पळत आहेत, अशी टीकाही या आमदारांनी केली. आम्ही सभागृहातच ठिय्या मांडून बसण्याचे जाहीर केल्यानंतर सरकारने वीजपुरवठा पूर्णपणे बंद करून टाकला, वातानुकुलिन यंत्रणाही बंद झाली आणि आतमध्ये आम्ही काही काळ गुदमरलोच होतो. आमच्यामध्ये चार महिला आमदारही होत्या. त्यांचाही विचार सरकारने आणि विधानसभाध्यक्षांनी केला नाही आणि किमान सोयीही देण्यास सरकारने सुरुवातीला नकार दिला, असा आमदारांचा आरोप आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदनसिंग यांनीही आमदारांशी करण्यात आलेल्या वर्तनाचा निषेध केला. ते म्हणाले की बादल सरकार अपयशी ठरले असून, पूर्ण राज्यात भ्रष्टाचार सोकावला आहे. काँग्रेसच्या आमदारांनी असे अनेक मुद्दे सभागृहात उपस्थित करायचे ठरवले होते. पण सरकारने विरोधकांची मुस्कुटदाबीच केली. त्यामुळे आमदारांना सभागृहात ठिय्या मांडून बसण्याखेरीज पर्याय राहिला नाही.
विधानसभेत झोपले आमदार रात्रभर
By admin | Updated: September 14, 2016 05:40 IST