ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २५ - स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करणारी महिला गेल्या आठवडाभरापासून संशयास्पदरित्या बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून सुरत पोलिस महिला व तिच्या कुटुंबियाचा शोध घेत आहेत.
गेल्या वर्षी सुरतमध्ये राहणा-या ३३ वर्षीय विवाहीत महिलेने आसाराम बापू यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. १९९७ ते २००६ या कालावधीत अहमदाबादजवळील आश्रमात असताना आसाराम बापूंनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार संबंधीत महिलेने होती. यानंतर त्या महिलेच्या लहान बहिणीनेदेखील आसाराम बापूंचा मुलगा नारायण साईविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आसाराम बापू व त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली असून दोघेही सध्या तुरुंगात आहेत.
आसाराम बापूंविरोधात तक्रार करणा-या पिडीत महिलेला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी त्या महिलेसोबत चार पोलिस कर्मचारी असतात. १८ डिसेंबररोजी महिला, तिचा पती आणि मुलगा असे तिघे जण अमरोली येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. तिथे पोलिस संरक्षणाची आवश्यकता नसल्याचे सांगत तिने पोलिसांना सोबत नेण्यास नकार दिला.तिच्या विनंतीनंतर पोलिस तिच्या घराबाहेरच थांबले होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पिडीत महिला व तिचे कुटुंबीय घरी परतलेले नाही. पोलिसांनी अमरोलीत चौकशी केली असता तिथे १८ डिसेंबररोजी कोणाचाही विवाह नसल्याचे उघड झाले. महिलेचा मोबाईलही स्विच ऑफ असल्याचे स्थानिक पोलिस अधिका-यांनी सांगितले. अखेरीस याप्रकरणी पोलिसांनी मिसींगची तक्रार दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, संबंधीत महिलेने गेल्याच आठवड्यात सुरत कोर्टासमोर बलात्कार प्रकरणासंबंधी जबाब बदलण्यासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर महिला बेपत्ता झाल्याने याप्रकरणाभोवतीचे गुढ आणखी वाढले आहे.