कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मोट्टा गावाजवळ काही समाजकंटकांनी कारवर बॉम्ब फेकल्यानंतर ती विजेच्या खांबावर आदळून मनोज यांचा मृत्यू झाला. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेसाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना त्याच विजेच्या खांबाला कुत्र्यांचे मृतदेह लटकविलेले आढळले. तणाव टाळण्यासाठी या कार्यकर्त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. या कृत्यामागे माकप असल्याचा आरोप भाजपा-रा.स्व. संघाच्या नेतृत्वाने केला आहे. संघ परिवारात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत असल्यामुळे धास्तावलेल्या माकपने अशांतता निर्माण करण्यासाठी कारवाया चालविल्या असल्याचे संघाचे विभाग कार्यवाहक व्ही. शशीधरन यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)
संघ नेत्याच्या स्मृतिदिनी कुत्र्यांना फाशी!
By admin | Updated: September 2, 2015 02:25 IST