पालनपूर - गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात डिसा शहरानजीक औद्यागिक क्षेत्रात मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट होऊन ती इमारत भस्मसात झाली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला व सहाजण जखमी झाले.
फटाक्यांच्या स्फोटामुळे या गोदामाचा स्लॅब कोसळला व त्याखाली दबून बहुतांश लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस अधीक्षक अक्षयराज मकवाना यांनी दिली. ते म्हणाले की, आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार व त्यांचे कुटुंबीय हे मध्य प्रदेशमधील मूळ रहिवासी आहेत. या गोदामात फटाक्यांची साठवणूक करण्यात आली होती. मात्र तिथे फटाके तयार करण्यात यायचे किंवा नाही याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. फटाक्यांच्या गोदामातील स्फोटामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख रुपये व जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत पटेल यांनी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीदेखील या अग्निकांडातील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.
बॉयलरचाही स्फोटपाच जखमींपैकी तीनजण गंभीर जखमी आहेत. फटाका गोदामातील स्फोटामुळे तिथे असलेल्या बॉयलरचाही स्फोट झाला असे सांगण्यात येत असले तरी त्याला गुजरात सरकारने तसेच पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. तसेच हा स्फोट नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला याबद्दलही पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही. फटाक्यांच्या गोदामात काम करण्यासाठी हे कामगार काही दिवसांपूर्वीच डिसा शहरात आले होते असेही सांगण्यात आले.
मध्य प्रदेशचे सरकारही गुजरातच्या संपर्कातडिसा शहरातील फटाक्यांच्या गोदामात झालेल्या स्फोटातील जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी तजवीज करा, असे आदेश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मध्य प्रदेश सरकार गुजरात सरकारच्या संपर्कात असल्याचे व दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तसेच मृतांच्या वासरदारांना मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.