चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र नेहमीच दिल्लीच्या मदतीसाठी धावून आला आहे. आताही मराठी माणूस दिल्लीतील भ्रष्टाचारी सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. भाजपा मराठी प्रकौष्ठच्यावतीने फडणवीस यांचा नागरी सत्कार दिल्लीतील महाराष्ट्र रंगायतनमध्ये करण्यात आला.
यावेळी फडणवीस म्हणाले की, दिल्लीतील केजरीवाल यांचे सरकार भ्रष्ट आहे. दिल्लीला वाचवायचे असेल तर दिल्लीत डबल इंजिनचे सरकार पाहिजे. मराठी माणसाने नेहमीच देशाचा विचार केला आहे. आताही दिल्लीत स्थायिक झालेला मराठी माणूस दिल्लीत सत्तापालट घडवून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
दिल्लीत येण्यापूर्वी मी अण्णा हजारे यांना भेटून आलो. त्यांनी सांगितले की, केजरीवाल देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्ती आहे. गेल्या १० वर्षात आप सरकारने खोटे बोलण्याचे धोरण ठेवले आहे. खोटेपणा आणि भ्रष्टाचार या स्पर्धेतील दोन्ही बक्षिसे आप सरकारलाच जातील. पंतप्रधान मोदी यांच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा विकास होत आहे, तसेच दिल्लीतही होणारच, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘दिल्लीतील मराठी माणसाच्या अपेक्षा’ वैभव डांगे म्हणाले की, गलाई कामगारांना पोलिस आणि प्रशासनाचा त्रास सहन करावा लागतो. मराठी लोकांनी मंदिर बांधले आहेत पण रस्ते नीट नाहीत. दिल्लीत दोन मराठी शाळा आहेत. मराठी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी मदतीची गरज आहे. शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हायला हवे. दिल्लीतील मराठी माणूस महाराष्ट्र सरकारकडे पालक म्हणून पाहतो. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यावे.