मागच्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या आगडोंबामध्ये मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आजपासून राज्यात सुरू करण्यात आलेल्या फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटदरम्यान कुकी समाजातील आंदोलक आणि सुरक्षा दलांचे जवान आमने सामने आल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. कुकी आंदोलकांनी रस्ते बंद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे रस्ते मोकळे करण्यासाठी सुरक्षा दलांचे जवान गेल्यानंतर त्यांच्यावर आंदोलकांनी दगडफेक केली. यात २७ जवान जखमी झाले असून, सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या बलप्रयोगामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
मणिपूरमध्ये मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १ मार्च रोजी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. तसेच ८ मार्च पासून राज्यातील प्रमुख महामार्गांवरून कुठल्याही अडथळ्याविना वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश केंद्रीय सुरक्षा दलांना दिले होते. तसेच वाहतुकीत अडथळा आणणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेशही अमित शाह यांनी दिले होते.
त्यानुसार आज केंद्रीय राखीव पोलीस दलाने राज्य प्रशासनासोबत मिळून ८ मार्चपासून फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटला सुरुवात केली होती. मात्र या फ्री मुव्हमेंटच्या पहिल्याच दिवशी हिंसाचार झाला. कांगपोकसी येथून सेनापती येथे जात असलेल्या सरकारी बसवर जमावाने हल्ला केला. या बसवर कथितपणे कुकी समुदायाच्या ललोकांना हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जोपर्यंत मणिपूरमधील पर्वतीय जिल्ह्यांसांठी वेगळी प्रशासकीय व्यवस्था करण्याची आपली मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठलीही वाहतूक नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. तसेच अश्रुधुराचे गोळे डागले. या कारवाईत काही आंदोलक जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला.