नवी दिल्ली : कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर असताना विदेशात पळून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी एक पाऊल टाकत गुरुवारी भारताने ब्रिटनकडे यासंदर्भात औपचारिक मागणी केली आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली. नवी दिल्लीतील ब्रिटनच्या उच्चायुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. तर भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त हे ब्रिटनच्या विदेश आणि राष्ट्रमंडळ कार्यालयाला याबाबतचे पत्र देणार आहेत. मल्ल्यांविरुद्धच्या कारवाईची माहितीही देण्यात येणार आहे. मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनशी सतत संपर्क ठेवला जाईल, असेही विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तपास यंत्रणेला असहकार्य करत असल्याच्या कारणावरून सरकारने यापूर्वीच विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. तथापि, मल्ल्यांविरुद्ध आता अजामीनपात्र वॉरंट आहे.मल्ल्या हे २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनला गेले होते. दरम्यान, सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी सरकार ब्रिटनशी संपर्क साधून कार्यवाही सुरू करणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)विजय मल्ल्या यांच्याकडे बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. देशातील प्रमुख १३ बँकांच्या कर्जाचा यात समावेश आहे.
मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची मागणी
By admin | Updated: April 29, 2016 05:08 IST