मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने प्रज्ञा सिंहसह सातही आरोपींना निर्दोष सोडले आहे. या निकालानंतर एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी देशभराचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तेव्हा त्यांच्याकडून जप्त केलेले ९०० रुपये परत मागितले आहे.
आजच्या या महागाईच्या काळात ९०० रुपयांची किंमत तशी काहीच नाहीय. परंतू, तरीही ते त्यांना हवे आहेत. यावर त्यांनी प्रश्न पैशांचा नाहीय, असे म्हटले आहे.
मालेगाव स्फोटासाठी जी सामग्री लागत होती ती त्यांनी उपलब्ध करून दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कुलकर्णी यांना भोपाळहून अटक करण्यात आली होती. कोर्टाने आज त्यांना सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. या निकालानंतर न्यायालयाकडे कुलकर्णी यांनी मागणी केली आहे. मला भोपाळमध्ये अटक करण्यात आली तेव्हा माझ्याकडून ९०० रुपये घेण्यात आले होते आणि ७५० रुपये रेकॉर्डमध्ये दाखवण्यात आले होते. ते ९०० रुपये मला परत मिळावेत. प्रश्न पैशांचा नाहीय, असे ते म्हणाले आहेत.
कुलकर्णी यांनी न्यायालयातच ही मागणी केली होती. यावर न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही मौल्यवान वस्तू परत करण्याचा न्यायालयाचा आदेश दिलेला नाही, असे म्हटले आहे. तरीही कुलकर्णी आपल्या पैशांच्या मागणीवर ठाम राहिले होते.
स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता
२९ सप्टेंबर २००८ रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता. १७ वर्षांच्या खटल्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिल रोजी सर्व सात आरोपींविरुद्ध निकाल राखून ठेवला होता. निकाल जाहीर करण्याची तारीख ८ मे निश्चित करण्यात आली होती. सर्व आरोपींना या दिवशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्यानंतर न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित केली.