अलाहाबाद उच्च न्यायालयाने जिममध्ये महिलांना प्रशिक्षण अथवा ट्रेनिंग देणाऱ्या पुरुषांच्या काम करण्याच्या पद्धतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, पुरुष प्रशिक्षक कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय महिलांना प्रशिक्षण देत आहेत. एवढेच नाही तर, यावेळी त्यांनी जिममध्ये महिलांच्या आदराच्या मुद्द्याचाही विशेषत्वाने उल्लेख केला. न्यायालय एका जिम प्रशिक्षकाविरुद्धच्या तक्रारीवर सुनावणी करत होते, ज्यात महिलेने प्रशिक्षकावर तिच्या मैत्रिणीचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे.
जस्टिस शेखर यादव या प्रकरणाची सुनावणी करत होते. बार अँड बेंचनुसार, ते म्हणाले, "सध्या महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित होऊ शकेल, अशा पुरेशा सुरक्षिततेशिवाय पुरुष जिम प्रशिक्षक महिलांना प्रशिक्षण देत आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. संबंधित प्रकरणात, प्रशिक्षकाने जिममध्ये आलेल्या एका महिलेला जातीवाचक शब्द वापरले होते.
गेल्या वर्षी, जिम ट्रेनर नितीन सैनी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती/जमाती कायदा १९८९ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा, धक्का दिल्याचा आणि व्यायाम करताना जिमबाहेर काढण्याचा आरोप आहे. एवढेच नाही, तर संबंधित महिलेने आरोप केला आहे की, आरोपीने तिच्या मैत्रीणीचा अश्लील व्हिडिओ देखील बनवला होता.
तत्पूर्वी, २७ ऑगस्ट रोजी न्यायालयाने आरोपीचे जिम संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे की नाही? हे तपासण्याचे आदेश दिले होते. तसेच, जिममध्ये महिला प्रशिक्षक आहेत की नाही? असेही विचारले होते. प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी होणार आहे.