नवी दिल्ली : खासगी कंपनीची पदे भरण्यासाठी मुलींना बोलावून मुलाखती घेण्याचा बेकायदेशीर प्रकार महाराष्ट्र सदनाच्या प्र्रशस्त लॉबित उघडकीस आल्याने सदनात येणाऱ्या सर्वच पाहुण्यांना ओळखपत्र दाखवून प्रवेश घेण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. याची अमलबजावणी आजपासूनच करण्यात आली आहे़ महाराष्ट्र सदनाची प्रशस्त लॉबी साऱ्यांनाच भुरळ पाडते. तिथे बसायला आलीशान खुर्च्या, सोफासेट व सोबतच वाचायला मासिके, वर्तमानपत्रे असल्याने सदनात वर्दळ असते. अनेकांना तिथे आल्याबरोबर वायफायची सुविधा उपलब्ध होत असल्याने दिवसभर अनेकांचा ठिय्या या लॉबित असतो. लॉबिच्या बाजुला असलेल्या प्रशस्त कॅटींनमध्ये चहा घेण्याच्या बहाण्याने अनेक दिल्लीकर सदनात शिरतात. सकाळी एकदा शिरले की दुपारनंतर किंवा सायंकाळीच तेथून बाहेर पडणारे अनेकजण आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विवध खासगी कंपनीचे अधिकारी, खासगी कंपन्यांमध्ये नोकरी लावून देतो असे कारण सांगून अनेकांना मुलाखतींनी बोलविणारे अनेक संस्थांची व्यक्तिही आहेत. कोठलेसे फुटकळ ओळखपत्र सोबत ठेवायचे, कुणी मागितले तर दाखवायचे आणि सदनाच्या सोयींचा फायदा घ्यायचा, हा अनेकांचा नित्यक्रम आहे. अनेकांसोबत लॅपटॉप असतो व सोबत कंपन्यांचे अर्जही असतात. तासानिहाय मुली व मुलांना बोलवून त्यांच्या मुलाखतीही तेथे ते घेतात. हरियाणा, पंजाबातील अनेक तरूण येत असतात. दोन दिवसांपूर्वी काही मुलींना बोलवून मुलाखती घेण्याचा सपाटा सदनातील लॉबित सुरू होता. मुलाखती घेणाऱ्या संबंधित व्यक्तीस तेथील सुरक्षा कर्मचाऱ्याने हटकले तेव्हा चांगलाच वाद झाला. तो बेकायदेशीरपणे मुलाखती घेत होता. त्यानंतर त्याला तेथून बोहर काढण्यात आले़ त्याने संबंधितांना धमक्याही दिल्या. हे प्रकरण पोलिसांत जाणार होते. पण त्याला समज देण्यात आली. वरचेवर घडणाऱ्या याप्रकारामुळे सदनात येणाऱ्या सर्वांनाच ओळखपत्र दाखवून प्रवेश देण्याचा निर्णय व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी घेतला. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्र सदनात आता ओळखपत्राची सक्ती!
By admin | Updated: February 6, 2015 01:51 IST